सूर्यनमस्काराला ‘ Sun salutation’ असंही म्हणतात. सूर्यनमस्कार ही एक योगासनांची साखळी आहे जी पहाटे केली जाते. याचा उद्देश असा असतो की सकाळी लवकर उठून सूर्यदर्शन घ्यावे, आणि आपले शरीर मन आणि आत्मा यांना जागं करावं.
सूर्यनमस्कार हा भारतीय मातीतील योगासनाचा प्रकार आहे पण आता त्याला जगभरातून प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळते आहे, कारण त्याचे अनेक शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक फायदे आहेत. सूर्यनमस्कार हा व्यायामाच्या आधी ‘वॉर्म अप ‘म्हणून किंवा स्वतंत्रपणे व्यायामाचा एक प्रकार म्हणून केला जातो.
सूर्यनमस्काराचा सराव कसा करावा
सूर्यनमस्कारात साधारणपणे 12 आसनांचा समावेश होतो. प्रत्येक आसन करताना एका विशिष्ट पद्धतीने श्वास घेणे, सोडणे ल यबद्ध हालचाली आणि ध्यानाची स्थिती याला महत्त्व आहे. सूर्यनमस्कार घालण्याच्या पद्धतीत विविधता असू शकते पण आपण सर्वसाधारण पद्धत पाहूया.
- प्रणामासन (Prayer pose) : तुमच्या योगासन करण्याच्या चटईवर हात छातीशी जोडून प्रार्थनेच्या स्थितीत उभे राहा ही स्थिती कृतज्ञता व्यक्त करते.
- हस्तउत्तानासन (Raised Arms Pose) : श्वास घ्या, हात वर करा सावकाश मागे झुकून पाठीला मागच्या दिशेने बाक द्या आणि तुमच्या शरीराला वरच्या दिशेने स्ट्रेच करा,
- हस्तपादासन (Hand to foot pose) : श्वास सोडा, कमरेत वाका आणि तुमचे हात तुमच्या पायाच्या बाजूला जमिनीवर ठेवा पाठीचा कणा ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा,
- अश्वसंचलनासन (Equestrian Pose): श्वास घ्या, तुमचा उजवा पाय सरळ मागे घ्या आणि डावा गुडघा वाकवून तो तुमच्या घोट्याच्या सरळ रांगेत ठेवा.
- दंडासन (Stick Pose) : आता श्वास सोडताना तुम्ही तुमचा डावा पाय उजव्या पायाच्या बरोबर मागे घ्या, आता तुमचं शरीर एका सरळ रेषेत असलं पाहिजे(Like plank)
- अष्टांगनमस्कार (Eight-limbed Pose) :तुमचे गुडघे छाती आणि हनुवटी जमिनीला टेकवा आणि नितंब (hips) किंचित वर उचला ही लो प्लॅकची सुधारित अवस्था आहे.
- भुजंगासन (Cobra Pose) :श्वास घ्या, थोडं पुढे आणि वरच्या दिशेने सारका हे करताना पाठीच्या कण्याला किंचित बाक येऊ द्या आणि लक्षात ठेवा हे करताना तुमचे हात खांद्याच्या रेषेत खाली असू द्या.
- अधोमुखश्वानासन (Downward Facing Dog Pose): श्वास सोडा, तुमचे नितंब(hips) वर उचला आणि उलटा V तयार होईल अशा स्थितीत या तुमचे हात आणि टाचा मात्र जमिनीवर घट्ट असू द्या.
- अश्वसंचलनासन(Equestrian Pose) :श्वास घ्या आणि तुमचा उजवा पाय पुढे घेऊन तुमच्या दोन्ही हातांच्या मध्ये ठेवा. हस्तपादा सन: श्वास सोडा तुमचा डावा पाय पुढे घेऊन उजव्या पायाच्या बाजूला ठेवा हे करताना कमरेत वाका.
- हस्तउत्तानासन (Raised Arms Pose) : श्वास घ्या, हात वर करा आणि मागे झुकून पाठीला किंचित बाक द्या.
- प्रणामासन (Prayer Pose): श्वास सोडा, अगदी सुरुवातीच्या स्थितीत या म्हणजे हात छातीशी जोडून प्रार्थनेच्या स्थितीत या.
सूर्यनमस्कार अनेक वेळा घातल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात तुमची लवचिकता वाढते, रक्ताभिसरण वाढते, श्वसनाचे कार्य चांगल्या रीतीने होते आणि मानसिक शांतता व स्पष्टता मिळते. योगासन करताना तुमचं शरीर काय सांगते ते ऐक णं खूप महत्त्वाचं असतं. अशा पद्धतीने आसनं करावी की ज्यात तुमचं शरीर विना तक्रार सहाय्य करेल, विशेषतः जेव्हा तुम्ही योगासन करण्यास नुकतीच सुरुवात करता किंवा तुम्हाला काही शारीरिक मर्यादा असतात तेव्हा तर त्याची काळजी घेतच योगासन करा.